विवेकानंद सेवा मंडळाची पडद्यामागील रंगकर्मींना मदत !

कलाकृती पाहून प्रेक्षागृहाच्या बाहेर पडताना आपण नाटकातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार या सगळ्यांची स्तुती करतो परंतु या पडद्यामागे काम करणाऱ्या स्वच्छताकर्मी, प्रकाश संयोजक, ध्वनिसंयोजक आणि इतर तंत्रज्ञांच्या कष्टाचा फारसा उल्लेख कुठे होत नाही. नाटक किंवा एखाद्या कलाकृतीच्या यशस्वी होण्यात या सर्वांचाही सिंहाचा वाटा असतो. परंतु यांना मिळणारे मानधन हे इतरांच्या तुलनेत मात्र तुटपुंजेच असते.

टाळेबंदीच्या काळात या वर्गाला आर्थिक त्रास सहन करावा लागला. अशा चौदाहून अधिक कुटुंबांनी विवेकानंद सेवा मंडळाकडे अन्नधान्य आणि शिध्यासाठी विचारणा केली. हे सर्व रंगकर्मी बोरिवली येथे प्रेक्षागृहात कामाला आणि डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. काहींच्या घरी लहान मुले तर काहींच्या घरी वयोवृद्ध लोक आहेत.

बहुतांश कुटुंबात ५-६ सदस्य असूनही त्यांनी ३-४ लोकांना पुरेल इतकाच शिधा घेऊन त्यात घरची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. जेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लहान मुलांच्या सोयीसाठी दुधाची सोया विचारली असता, परवडत नसल्याने आम्ही मुलांना दूध प्यायची सवय लावलेली नाही असे त्यांनी सांगितले. जरा खोलवर विचारपूस करता काहींच्या बाबतीत तर ते केवळ एकवेळ जेवूनच अन्नधान्याची बचत करत असल्याचे विदारक कारण समजले.

ही हृदयद्रावक परिस्थिती समजल्यानंतर मंडळाने तातडीने पावले उचलली. या कुटुंबांपैकी बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन किंवा जवळपास झेरॉक्स/स्कॅनर मशीनची सोय नसल्याने कागदपत्रे मिळवण्यास थोडी अडचण येत होती पण तरीही या कुटुंबांची आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी होती.

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढचा अडथळा होता तो ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने त्यांना एका दुकानातून समान उपलब्ध करून देण्याचा !

परंतु यातूनही तोडगा काढत त्यांनी सर्वांनी मंडळाने नेमून दिलेल्या दुकानातून समान घेऊन जाण्याची तयारी दर्शवली. या सर्व कुटुंबांनी हसतमुखाने मंडळाच्या मदतीचे आभार मानले आणि कार्यकर्त्याना आशीर्वाद दिले. आणि याच शुभेच्छा आम्हाला या संकटकाळात उमेदीने काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

यातून मंडळाच्या कार्यकर्त्यांना 'रंगमंचावरील कलाकारांइतकेच पडद्यामागील रंगकर्मींचे योगदान हे एखाद्या कलाकृतीच्या यशात असते' याचाही प्रत्यय आला.


{{-- --}}