९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान आपल्या डोंबिवली नगरीला मिळाला आणि डोंबिवलीतील साहित्य रसिकांच्या साहित्य प्रेमाला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. एखाद्या नगरासाठी साहित्य सम्मेलन आयोजित करणे ही खुप मनाची बाब असते. तो मान या वर्षी डोंबिवली नगरीला मिळाला आणि सगळ्या नागरिकांनी साहित्य सम्मेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली.
या साहित्याच्या यज्ञात आपलंही खारीचं का होईना पण योगदान असावं असं शहरातल्या प्रत्येकाला वाटत होतं. तशातच साहित्य संमेलनाची सुरवात ज्या ग्रंथदिंडीने होणार होती त्या ग्रंथदिंडीची पालखी वाहून नेण्याचा मान आपल्या विवेकानंद सेवा मंडळाला मिळाला. दरवर्षी डोंबिवलीत होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत गणेश मंदिर संस्थानाची गणरायाची पालखी वाहून नेण्याचा मान मंडळाला गेली कित्येक वर्षे मिळत आला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मंडळाला तो आनंद पुन्हा अनुभवता आला. यासाठी पालखी वाहून नेण्याची मुख्य जबाबदारी असलेले मंडळातील १० कार्यकर्ते हे पारंपरिक मावळ्यांच्या वेशात तयार झाले होते. याव्यतिरिक्त मंडळाचे इतरही बरेच कार्यकर्ते या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
डोंबिलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरातून निघालेली ही ग्रंथदिंडी MIDC स्थित साहित्य संमेलनस्थळी पोहचायची होती. या ग्रंथदिंडीत विविध संस्था, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतरही अनेक युवक युवती आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. अनेक ढोल पथके आणि लेझीम पथकांनी ग्रंथदिंडीला अगदी मराठमोळ्या वातावरणात गुंफून टाकले होते. मराठी भाषिक तसेच अन्य भाषिक नागरिकही शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब असणाऱ्या या सोहळ्यात सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील वृद्ध नागरिकांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल इतका होता. या सर्व दिंडीच्या अग्रभागी मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रंथ वाहून नेणारे मावळ्यांच्या वेशातील कार्यकर्ते होते. त्यांना सारथ्य करण्यासाठी गणेश मंदिर संस्थानाचे पदाधिकारी आणि सम्मेलनाच्या आयोजक समितीचे पदाधिकारी अशी मंडळी होती.
एकूणच अतिशय उत्साहात सुरु झालेल्या या ग्रंथदिंडीचा शेवट सम्मेलनस्थळी असलेल्या मुख्य मंचावर झाला आणि त्यानंतर इतर कार्यक्रमांना सुरवात झाली. मराठी भाषा, साहित्य आणि डोंबिवली नगराच्या दृष्टीने अभिमानाची बाब असणाऱ्या या सोहळ्यात आपला खारीचा वाटा उचलता आला याचा विवेकानंद सेवा मंडळाला कायमच अभिमान वाटत राहील. मंडळाच्या दृष्टीने खरोखरच हि एक ऐतिहासिक गोष्ट होती आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या स्मृतीत हा सोहळा कायम लक्षात राहील.