Silver Jubilee Year

रौप्य महोत्सवी वर्षात विवेकानंद सेवा मंडळाचे २५ नवीन सामाजिक प्रकल्प

  • सामाजिक, आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षण, ग्रामविकास, जलसंधारण, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक उद्योजकता अशा विविधांगी सेवा प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
  • याच रौप्य महोत्सवी समारोहाच्या निमित्ताने ३ समाजसेवकांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  • मंडळाच्या ग्रामविकास प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील एक गाव मा. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेत असल्याची घोषणा.
मुंबई, १८ ऑक्टोबर २०१६: ११९१ मध्ये सामाजिक-आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांच्या विकासाचे ध्येय समोर ठेऊ स्थापन झालेल्या विवेकानंद सेवा मंडळाने संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिक्षण, ग्रामविकास, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उद्योजकता अशा विविध क्षेत्रात २५ सेवा प्रकल्पांची सुरुवात केली.

“विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांनी सामाजिक कार्याकरिता निस्वार्थ वृत्तीने चालवलेली आणि वृद्धिंगत केलेली संस्था म्हणजेच विवेकानंद सेवा मंडळ. गेल्या २५ वर्षांचा प्रवास अनेक पैलूंनी फलदायी ठरणारा आहे. समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थी, वनवासी महिला आणि विविध प्रकल्पांमधील प्रत्येक घटक यांच्या जीवनामध्ये प्रकाशाचे चैतन्य फुलविण्याचे काम या प्रवासात मंडळाने करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज रौप्य महोत्सवी समारोह साजरा करत असतांना संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे स्वरूप आणि विषय ‘प्रकाशयात्री’ असे ठेवण्यात आले. याच रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १० सेवा प्रकल्पांच्या अंतर्गत अनुकुल समाजपरिवर्तनाची शक्ती असलेले विविध २५ उपक्रम संपूर्ण वर्षभरात सुरु करावे असा विचार मंडळाने केला आणि प्रत्यक्षात साकार देखील केला” असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री. केतन बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या तीन समाजसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला.

११९१ मध्ये लहानशा अभियांत्रिकी ग्रंथालायापासून विवेकानंद सेवा मंडळाने सुरु केलेल्या प्रवासात अनेक टप्पे गाठले. १९९५ मध्ये विहीगाव (ता. शहापूर, जिल्हा ठाणे) या गावातून ग्रामविकास प्रकल्पाची सुरुवात झाली याच कामाचा पुढचा टप्पा म्हणजे समान कार्यप्रणालीवर आधारित प्रकल्प खोडदे (ता. वाडा, जिल्हा पालघर) येथे २०१२ मध्ये सुरु करण्यात आला. आज विविध क्षेत्रात मंडळाचे प्रकल्प सेवेचा अनुकुल प्रयत्न करत आहेत. मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत असतांना ‘प्रकाशयात्री’ हा विषय ठरवण्यात आला. रविवार दि. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी संपन्न झालेल्या रौप्य महोत्सवी समारोहाप्रसंगी तीन प्रकाशयात्रींना मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रु.२१०००/- चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

“ ज्या तीनही संस्थांच्या नेतृत्वाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आलं त्या संस्थांमध्ये आणि पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणारी संस्था, विवेकानंद सेवा मंडळ या चारही संस्था सेवा या एका धाग्याने एकमेकांना बांधून आहेत आणि प्रत्येक संस्था आपापल्या मार्गाने सेवेचे व्रत समाजात संस्करित करत आहेत आणि समाज परिवर्तनाच्या अनुकूल वाटेवर मार्गक्रमण करत आहेत. या संपूर्ण परिश्रमांना समाजातील प्रत्येक घटकाचा पाठींबा मिळणे आवश्यक आहे.” असे मत या कार्यक्रमाचे प्रकाशायात्री आणि स्वरूप वर्धिनी, पुणे यांचे उपाध्यक्ष मा. श्री शिरीष पटवर्धन यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

एक अतीव आनंदाचा आणि अभिमानाचा क्षणही या कार्यक्रमाने अनुभवला. ज्या विहिगावामध्ये विवेकानंद सेवा मंडळ कार्यरत आहे ते गाव राज्यसभा खासदार मा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी नुकतेच सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतलं. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांशी व्हीडीओ काल द्वारे संवाद साधला. “ विवेकानंद सेवा मंडळाने विहिगावात आतापर्यत केलेलं कार्य हे पुढील विकासाकरिता अगदी फलदाई ठरलं आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

जून २०१६ मध्ये २५ सेवाप्रकल्पांच्या अंतर्गत विहीगाव येथे बांधल्या गेलेल्या 2 बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या दोन बंधार्यांमध्ये 2 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या बंधार्याचे काम संस्थेच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने पूर्ण करण्यात आलं. भारत विकास परिषद आणि टिळकनगर गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली आणि इतर काही देणगीदार यांच्या आर्थिक सहाय्याने हा प्रकल्प मंडळाला यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेता आला.

शैक्षणिक प्रकल्पांच्या अंतर्गत, ‘पुस्तक मित्र’ या उपक्रमाची अंमलबजावणी ५ शाळांमध्ये करण्यात आली. यामध्ये प्राथमिक टप्प्यात शालेय विद्यार्थ्यांकरिता १००-१२० पुस्तकांचा समावेश समावेश असणारी एक पेटी शाळेला देण्यात आली. शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील प्राप्त व्हाव्या या उद्देशाने डोल्हारे येथील आश्रम शाळेत शैक्षणिक केंद्राची स्थापना करण्यात. नालंदा शैक्षणिक प्रकल्पांतर्गत उपक्रमाची सुरुवात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आणखी एका शाळेतून या वर्षी करण्यात आली. एकूण चार शाळांमधील २३१ विद्यार्थी नालंदा प्रकल्पाच्या माध्यमातून संपर्कात आहेत. अभियांत्रिकी प्रकल्पांतर्गत Electronics Component Library सुरु करण्यात आली. विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काम करणाऱ्या Save Indian Farmer या संस्थेकरिता इलेक्ट्रोनिक शैक्षणिक साहित्यामध्ये Software Deployment चं काम देखील करण्यात आलं.

या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या तीन व्यक्तीमत्वांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ. चंद्रीका चौहान (अध्यक्ष – उद्योगवर्धिनी, सोलापूर), श्री. चैतराम पवार (संस्थापक – वन व्यवस्थापन समिती, बारीपाडा, धुळे आणि उपाध्यक्ष – वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र) आणि श्री. शिरीष पटवर्धन (उपाध्यक्ष – स्व-रूपवर्धिनी) यांचा समावेश होता.

शिरीष पटवर्धन यांची स्व-रूपवर्धिनी ही संस्था पुण्यामध्ये सेवा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता कार्यरत एक अग्रगण्य संस्था आहे. पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाकरिता कार्य करणारी संस्था म्हणूण स्व-रूप वर्धिनी परिचयाची आहे.

१०० % वनवासी क्षेत्र असलेल्या बारीपाडा या गावाचा पद्धतशीर कार्यप्रणालीणे कायापालट करून गावात विकासाची गंगा आणण्याचं काम केलेले आणि आजही सातत्याने करत असलेले श्री. चैतराम पवार त्यांच्या या कार्यामुळे सुपरिचित आहेत. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, शेती विकासासंबधित आंतराष्ट्रीय पुरस्कार, थायलंड आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

उद्योग वर्धिनी संस्थेच्या चंद्रिकाताई चौहान यांनी स्वतःच्या पेशामध्ये बदल घडवत आजूबाजूच्या अजेक महिलांना उद्योजिका म्हणून उभे केले. उद्योग वर्धिनी या संस्थेने सामाजिक उद्योजकता आणि त्या माध्यमातून महिला सक्षमिकरण हे हेतू सध्या करण्यासाठी सामान्य कौशल्यांचा उपयोग करून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून आकार घेतला आहे.