विहिगाव : नवचंडी हवन व प्रवचन

Vihi Yadnya
सेवा हे यज्ञकुंड.. समिधा सम हम जले...!

सेवा हे यज्ञकुंड.. समिधा सम हम जले...!

समर्पित भावनेने केले जाणारे कार्य हे यज्ञामधील समिधेप्रमाणे असते. ज्या प्रमाणे यज्ञात टाकलेल्या समिधेचे अस्तित्व उरत नाही त्याच प्रमाणे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्यांचे केवळ कार्य.. त्यांची सेवा.. त्यांनी केलेले यज्ञ दिसून येते.

भौतिक,आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यक्तिगत उद्देश्य साध्य करण्यासाठी प्राचीन काळापासून भारतात यज्ञ करण्याची परंपरा आहे. देशसेवा हे त्याच यज्ञाचे एक व्यापक रूप आहे. गेल्या दोन दशकांपासून मंडळाच्या सहवासात असलेल्या कसारामधील विहिगावाच्या विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी मंडळाने विविध स्तरांवर कामे केली आहेत आणि आजही अविरत करत आहे. विही मधील गावकऱ्यांच्या एकत्रीकरणासाठी , तसेच जनकल्याण व आत्मोन्नतीसाठी विहिगाव ग्रामपंचायत आणि विवेकानंद सेवा मंडळ यांचा संयुक्त सहभागाने दि. १८ आणि १९ मार्च २०१७ रोजी प्रवचन आणि नवचंडी होमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ मार्च रोजी ह. भ. प. बाळकृष्णबुवा पाटील ह्यांचे सुश्राव्य प्रवचन ऐकण्याची संधी सर्वांना मिळाली. वेदशास्त्रेत निपुण असलेले बाळकृष्णबुवा पाटीलांनी आजच्या तरुण पिढीचे आचार - विचार कसे असावेत, समाजासाठी आणि देशासाठी तरुण पिढीचे योगदान किती महत्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनातून समजावून सांगितले. किर्तनानंतर भारावून गेलेल्या युवा पिढीतील काही तरुणांनी कार्यकर्त्यांसोबत भजन आणि कीर्तनाचा खेळही मांडला.

Bhajan Gavkaryansobat

१९ मार्च रोजी विहिगावातील गावठाण येथे सकाळी ९ वाजता होमचे नियोजन करण्यात आले होते. नवचंडी होम म्हणजे देवीची उपासना. संपूर्ण गावाला आरोग्य, वैभव, शक्ती, समृद्धी आणि सफलता लाभण्यासाठी या होमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष होमाला गावाच्या प्रत्येक पाड्यावरून एक जोडपे बसले होते. ह्या २ दिवसांच्या कार्यासाठी गावातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सर्व गावकऱ्यांसाठी आणि मंडळातील कार्यकर्त्यांसाठी तीर्थ प्रसादाचे आयोजनही केले होते.

यज्ञात झालेल्या मंत्र पठणामुळे वातावरणात उत्तम स्पंदनं निर्माण झाली होती. नवीन कार्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळावी आणि विविध पाड्यांचे एकत्रीकरण होऊन विहिगावची उन्नतीकडे वाटचाल व्हावी हे देखील ह्या यज्ञाचे उद्देश्य होते.